दिव्यांगांना घडवले शिवरायांचे दर्शन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक अशा अभेद्य किल्ले रायगडाची निवड केली. इथूनच लोकाभिमुख, रयतहित जोपासणारा व जगाला आदर्श ठरावा असा राज्यकारभार राजांनी करून दाखविला. छत्रपती शिवरायांच्या शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर जाऊन राजांचे दर्शन घेण्याची प्रत्येक शिवप्रेमी भारतीयांची तळमळ व इच्छा असते. रायगड रोपवे प्रशासनाने अभिमानास्पद व कृतिशील उपक्रम राबविला. यामध्ये रोपवे व्यवस्थापक खातू यांच्या पुढाकाराने हजारो दिव्यांगांना रोपवेतून विनामूल्य दर्शन घडवले. दिव्यांग बांधवांनी राजांना अभिवादन केले; यावेळी त्यांच्या चेहर्यावर निखळणारा आनंद पाहण्यासारखा होता.
दि.3 डिसेंबर 2021 रोजी चार वर्षांपूर्वी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोपवे प्रशासनाने दिव्यागांना रोपवे प्रवास विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ही विनामूल्य सेवा रोपवे प्रशासनाने आजपर्यंत व यापुढेही दिव्यांगांसाठी चालू ठेवली जाणार आहे, अशी माहिती रोपवे व्यवस्थापक खातू यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत आत्तापर्यंतच्या काळातील सर्वाधिक सुमारे 700 ते 800 दिव्यांगांनी रोपवेने प्रवासाचा आनंद घेतला, अशी माहिती रोपवे प्रशासनाकडून देण्यात आली. रोपवेने दिलेल्या या सेवेबद्दल दिव्यांग बांधवांनी रोपवे व्यवस्थापनाचे आभार मानले.