वाहनचालक, ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरूच
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा ते अलिबाग या मुख्य मार्गावरील चौल नाका ते खारगल्लीदरम्यान सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटचे काम सुरू असताना काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
वाहनांची ये-जा सुरू असताना उडणारी धूळ नागरिकांच्या नाकातोंडात जात असून, श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारींची भीती वाढली आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाचा त्रास मात्र नागरिकांनीच सहन करायचा का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
रेवदंडा-अलिबाग हा परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच अवजड आणि हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यातच रस्त्याच्या कामासाठी काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले असून, वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट हवेत पसरत आहेत. धूळ उडू नये म्हणून काही ठिकाणी पाण्याची फवारणी केली जात असली, तरी ती पुरेशी आणि नियमित आहे का, हा प्रश्न कायम आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना परिसरातील घरे, दुकाने आणि रस्त्यालगतच्या व्यवसायांमध्ये धुळ शिरत आहे. दुचाकीस्वारांना समोरचे वाहन स्पष्टपणे दिसण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, धुळीमुळे अपघाताचा धोकाही वाढू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनासंबंधी त्रास असलेल्या व्यक्तींना अशा वातावरणाचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी नियमित पाण्याची फवारणी, खोदलेल्या भागाची सुरक्षित व्यवस्था, माती व बांधकाम साहित्याची योग्य हाताळणी आणि वाहनचालकांना स्पष्ट सूचना देणे आवश्यक आहे. मात्र, या मूलभूत बाबींची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी अलिबाग, चौल, रेवदंडा आणि आसपासच्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी होते. अशा वेळी रस्त्याचे सुरू असलेले काम, खोदलेले भाग आणि अपुरी दिशादर्शक व्यवस्था यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः अरुंद झालेल्या रस्त्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची गर्दी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
रस्त्याचे काँक्रीटीकरण ही विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाब असली, तरी काम सुरू असताना नागरिकांना धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागणे योग्य नाही. संबंधित विभागाने कामाचा वेग, गुणवत्ता आणि सुरक्षितता या तिन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करावे. धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पुरेसे सुरक्षा फलक, शनिवार-रविवार विशेष वाहतूक नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
दिशादर्शक फलकांचा अभाव
रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुढे खोदकाम आहे, रस्ता अरुंद झाला आहे, वाहतुकीचा मार्ग बदलला आहे किंवा वेग कमी करणे आवश्यक आहे, याची माहिती वाहनचालकांना पुरेशा अंतरावरून मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी ठळक अक्षरांतील दिशादर्शक फलक, धोक्याचे इशारे, रात्री स्पष्ट दिसणारे परावर्तित फलक, सुरक्षित अडथळे आणि आवश्यक ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करावी. अचानक समोर येणाऱ्या खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनचालक गोंधळल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोका ओळखून आधीच खबरदारी घेणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे.
सुरक्षा रक्षकांच्या कामकाजाव प्रश्न चिन्ह
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तैनात असलेल्या होमगार्ड व सुरक्षा रक्षकांच्या कामकाजाबाबतही स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. काही कर्मचारी वाहतूक नियंत्रणाऐवजी मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. या तक्रारींची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा करावी.
