| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेनेशी गद्दारी करणार्या अलिबागच्या आमदारासह कोकणातील सहाही बंडखोरांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असा खरमरीत इशारा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी बदलापूर येथे आयोजित केलेल्या कोकणवासियांच्या मेळाव्यात बोलताना दिला.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अनंत गीते हे शिवसेना वाचविण्यासाठी सक्रिय झाले असून, आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी सर्वच बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. रायगड, रत्नागिरीतील सहा आमदारांनी बंडखोरी करुन पक्षाशी बेईमानी केली. त्यांना धडा शिकविण्यासाठी मी आता मैदानात उतरलो आहे. अलिबागच्या आमदारासह अन्य बंडखोर आमदारांना आता बाटलीबंद करण्याची वेळ आली असून, जे निष्ठावंत आहेत त्यांनी पक्षाशी प्रामाणिक रहावे,असे आवाहनही त्यांनी केले.
ज्या बंडखोरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला संकटात टाकले त्या संघटनेला आपल्याला वाचवायचे आहे. शिवसेना आपली आई आहे त्यासाठी भावकीतले कलह बाजुला ठेऊन आईला म्हणजे शिवसेनेला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,असे गीते म्हणाले.
विरोधकांच्या सुरत वारीवरही त्यांनी कडाडून हल्ला चढविला. हिंदवी स्वराज्य स्थापन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा सूरत लुटली होती आणि त्याच सुरतेमध्ये महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेचे बंडखोर गेले होते अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.अशा बंडखोरांना पुन्हा निवडून द्यायचे नाही,असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.
आज व्यासपीठावर हजर असणारा उद्या शिवसेनेत असेल की नाही हे कुणीच सांगता येत नाही, असे सांगत त्यांनी शीतल म्हात्रे यांचे उदाहरण दिले. ती बाई अलिबागच्या मेळाव्यात काय जोरजोरात भाषण देत होती आणि तीच आता बंडखोरांमध्ये सहभागी झालेली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
शिवसेना संकटात आहे हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही,पण अशा संकटातही आपण सार्यांनी आपापसामधील मतभेद बाजुला ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
अनंत गीते,केंद्रीय मंत्री
यावेळी त्यांनी कोकणात पुढील महिन्यात प्रमुख कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचे सुतोवाच केले.यासाठी आराखडा तयार केला जात असून,पक्षातील निष्ठावंतांना एकत्र करण्यासाठी यापुढे आपण स्वस्थ बसणार नाही असेही ते म्हणाले.
शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकेवर 20 जुलैला सुनावणी
सरन्यायाधीश एन.व्ही रमण्णा यांच्या नेतृत्वातील खंडपीठ येत्या 20 जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी घेणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेत बदल घडवून आणणार्या शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेले खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करणार आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली याचिका, उपसभापतींनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका, उपसभापतींना कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी भरत गोगावलेसह 14 शिवसेना आमदारांनी दाखल केलेली याचिका, उपसभापतींच्या हकालपट्टीचा निर्णय होईपर्यंत अपात्रतेची याचिका या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.
27 जून रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने बंडखोर आमदारांना उपसभापतींच्या अपात्रतेच्या नोटिशीला लेखी उत्तरे दाखल करण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.
महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निर्देशाला आव्हान देणारी याचिका शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू (उद्धव ठाकरे गटाशी संबंधित) यांनी दाखल केली होती. मात्र 29 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट थांबवण्यास नकार दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ठाकरेंचा फडणवीसांना फोन वृत्त निराधार – शिवसेना
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही तासांत शिवसेना पक्ष वाचविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी देखील ठाकरेंचा फडणवीसांना फोन अशा बातम्या अनेक माध्यमांनी चालवल्या. परंतु उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केलेला नाही. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत, असं शिवसेनेच्या वतीने आधीच स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी शिवसेनेच्या वतीने खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि त्यांच्याजवळ असलेले आमदार पाहता आता ही परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे, असं समजल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विश्वासातल्या आणि फडणवीसांशी उत्तम कनेक्ट असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून देवेंद्र यांच्या संपर्क साधला, असं वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केलं. ठाकरेंनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केल्याचं काही वृत्त माध्यमं चालवत आहेत. मात्र या सगळ्या अफवा आहेत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना किंवा कोणत्याही भाजप नेत्याला फोन केलेला नाही, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे.