खालापूर नगरपंचायतीवर लाल बावटा फडकवणार

संतोष जंगम यांची धडाकेबाज मुलाखत
। गुरूनाथ साठेलकर । खालापूर ।
खालापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील याच्या मार्गदर्शनाखाली शेकापचा लाल बावटा पुन्हा फडकेल असा दावा शेकापचे नेते संतोष जंगम यांनी केला आहे. गेल्या 5 वर्षात शेकापने खालापूरात विकासासाठी विविध माध्यमातून सरकारी निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे शहराचा कायापालट झाला आहे. भविष्यातही हा विकास पुढे सुरु ठेवण्यासाठी शेकाप कटीबंध असल्याचे जंगम यांनी स्पष्ट केले.

निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शेकाप नेते संतोष जंगम यांनी केलेली कृषीवलशी केलेली बातचीत पुढील प्रमाणे.

खालापूर नगरपंचायत निवडणुकीत आपण युती किंवा आघाडी यासाठी प्रयत्न केले होते का ?
संतोष जंगम : शेतकरी कामगार पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. 2016 साली झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने बहुमताच्या जोरावर खालापूर नगरपंचायतीत सत्ता संपादित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतर आमच्या सोबत येऊन विकास कामांना हातभार लावला होता. विरोधात असलेल्या शिवसेनेने देखील विकास कामात आमच्यासोबत जुळवून घेतले होते. गेल्या पाच वर्षात शेतकरी कामगार पक्षाने ज्या पद्धतीने खालापूरच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले होते, ते सर्वांना ज्ञात आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात सर्वांना सोबत घेऊन कारभार केला होता. मागची निवडणूक आम्ही जिंकली म्हणून, ही निवडणूक देखील आम्ही स्वबळावरच लढवावी अशा भ्रमात न राहता आणि विरोधाला विरोध हे धोरण न ठेवता आम्ही आघाडी किंवा युती होईल अशी अटकळ बांधली होती. मात्र जेथे आमचे उमेदवार ठामपणे निवडून येतील, अशी आम्हाला खात्री होती, त्याच ठिकाणी मुद्दामहून उमेदवारीचा आग्रह धरल्याने, तसेच काहींच्या वैयक्तिक अस्मितेला ठेच लागल्याने आघाडी किंवा युती झाली नाही.

युती किंवा आघाडी न झाल्याचा फटका तुम्हाला किती जाणवेल?
संतोष जंगम : मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे विजयी होण्याची क्षमता होती, तरीही लोकशाही प्रक्रियेचे संकेत जाणून आम्ही एक पाऊल मागे येत, युती किंवा आघाडी व्हावी या मानसिकतेत होतो. दुर्दैवाने ती झाली नाही, म्हणून आम्ही खचलो गेलो नाही तर तडजोडीत आमच्या कार्यकर्त्यांना नाराज करून दुसर्‍यांना संधी देण्याचा प्रकार या निमित्ताने टळला. उलटपक्षी आम्ही मजबुतीने पक्षाच्या विचारधारेवर निवडणुकीला सामोरे जात आहोत.

इतकी वर्षे आपण या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, या निवडणुकीत तुम्ही किंवा शिवानी जंगम यांनी सहभाग का घेतला नाही?
संतोष जंगम : फक्त निवडून आल्यावरच आपण राजकारणात आहोत हे सिद्ध होते, या भ्रमात आम्ही दोघेही नाहीआहोत किंबहुना या निवडणुकीत आमच्याशिवाय आमचे कार्यकर्ते कसे निवडून येऊ शकतात हे दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही दोघेही या निवडणुकीत विविध प्रभागात नाम निर्देशन पत्र दाखल केली होती. त्यावेळी विरोधकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात असा संभ्रम निर्माण करून दिला होता की, आम्ही ज्या ठिकाणी निवडून येण्याची खात्री आहे, त्याच ठिकाणी कार्यकर्त्याला बाजूला सारून आम्ही उमेदवार राहू. ऐनवेळी आम्ही माघार घेतली त्यामुळे त्या ठिकाणच्या उमेदवार आणि मतदारांच्या हे लक्षात आले की, आम्ही फक्त राजकारण करत नाही तर कार्यकर्ता घडवतो.
विरोधकांना आमच्यावर टीका करण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत, म्हणून ते आम्ही या निवडणुकीत उभे नसल्याचे चित्र वेगवेगळ्या पद्धतीने रंगवत आहेत. एका प्रभागातील ओबीसी आरक्षित पदासाठीची निवडणूक प्रक्रिया कोर्टाच्या अनुबंधामुळे स्थगित आहे, त्या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. याचा अर्थ असा की, मी या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सामील आहे. ही बाब विरोधकांच्या पक्की लक्षात आहे तरी ते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.

विरोधक तुमच्या कारभारावर टीका करताना, तुम्ही तुमच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली, खालापूर महोत्सवात मनमानी केली, विकास कामे करताना विरोधी पक्षाला विश्‍वासात घेतले नाही असे मुद्दे पुढे आणत आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय आहे?
संतोष जंगम : निवडणूक प्रचारात टीका होणे हे सहाजिकच आहे. आम्ही आमच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली हा विरोधकांचा मुद्दा हास्यास्पद आहे. ई-निविदेचे निकष आणि प्रशासकीय पूर्तता झाल्याशिवाय नगरपंचायतीचे कोणतेच काम झाले नाही. मागील पाच वर्षात आमच्या कारभारावर विद्यमान आणि माजी आमदार यांचे लक्ष होते. मला आठवत नाही की त्यांनी या बाबतीत कधी आमच्यावर तसे आरोप केले नाहीत. त्यामुळे त्या मुद्द्याकडे आम्ही प्रचार प्रक्रियेचा भाग म्हणून पाहतो. खालापूर महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा हे मुद्दे आमच्यावर टीका करण्यासारखे नाहीत. या दोन्ही आयोजनातून खालापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक अस्मितेला आम्ही जागृत केले आहे. त्या माध्यमातून खालापुरच्या वेगळ्या वैभवाची झलक आम्ही जगाला दाखवून दिली आहे. खानापुरातील कलाकार आणि खेळाडूंच्या स्किलला संधी देण्याचा तो संकल्प होता.
विकास कामांमध्ये आम्ही विरोधी पक्षाला विश्‍वासात घेतले नाही असा आरोप हास्यास्पद आहे, कारण जर विकास कामे त्यांना मर्जीत घेतल्याशिवाय झाली नसती तर त्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवलाच नसता. नगर पंचायतीचा कारभार करताना आम्ही सर्वांना विश्‍वासात घेतले होते म्हणून आर्थिक तरतुदी नसताना, राज्य सरकारकडून पतपुरवठा मुबलक प्रमाणात होत नसतानाही आम्ही कोरना, महापूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना येणार्‍या अडचणी बाजूला सारून विकास कामे केली. मतदार हे जाणतात, त्यामुळे त्या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष करतो.
2016 पूर्वीचे खालापूर आणि आजवर त्यात झालेला बदल, फक्त मतदारांना नव्हे तर महसुली क्षेत्र म्हणून येथे वावरणार्‍या नागरिकांच्या लक्षात येत असेलच. आम्ही आयत्या मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही, तर कष्टाने खालापूरला विकासात्मक शहर म्हणून दर्जा देण्याचा योग्य प्रयत्न केला आहे.

निवडणुकीत विरोधक तुमच्यावर टीका करतात, मात्र तुमच्याकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात नाही, यामागे कारण काय?
संतोष जंगम : आमचे मार्गदर्शक आमदार भाई जयंत पाटील यांनी आम्हाला शिकवण दिली आहे की, विरोधकांनी टीका करणे हे जागृत लोकशाहीचे लक्षण आहे. मनिंदकाचे घर असावे शेजारीफ असे म्हणतात त्याप्रमाणे आमच्यावर राजकीय निंदा होत आहे. त्याला प्रत्युत्तर न देता आम्ही विकास कामांचे प्रगती पुस्तक घेऊन मतदारांच्या सामोरे जात असल्याने विरोधकांवर चिखलफेक करण्यात आम्ही वेळ घालवत नाही, किंबहुना विरोधक आमच्या बाबतीत जे मुद्दे जनतेसमोर आणत आहेत, त्यातून आम्ही जे काय केले, याचा जणू प्रचारच ते करत आहेत.

आपण निवडणूकीत उभे केलेले उमेदवार बहुतांशी नवखे आहेत त्याबद्दल तुमचे नेमके म्हणणे काय?
संतोष जंगम : राजकारणी म्हणून कोणी जन्माला येत नाही, भारतीय राज्य घटनेनुसार जसा सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे, तसाच कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकारही आहे. आमचे काही उमेदवार नवखे असतील किंवा आहेत, असे कोणाला भासत जरी असले तरी, त्यांच्या मागे असलेल्या पक्षीय भूमिकेची ग्राह्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.
मागच्या निवडणुकीत शिवानी जंगम देखील नवख्या होत्या, नगर पंचायतीचा कारभार देखील नव्याने करण्याचा योग नगराध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे प्रथमच आला होता, मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणामुळे त्यांनी जो विकासाचा आलेख मतदारांच्या समोर मांडला आहे, त्यावरून आणि त्याच सोबत आमच्या इतर सर्व सहकार्‍यानी मतदारांना न्याय देण्याची जी भूमिका मागील पाच वर्षात निभावली, त्याच बळावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. म्हणून कोणी नवखे किंवा अनुभवी हा मुद्दा गौण ठरतो.

ही निवडणूक तुम्हाला जड जाणार असे एकंदर वातावरण विरोधकांकडून निर्माण केले जात आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ?
प्रश्‍न : लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक निवडणुक ही सर्वच राजकीय पक्षांना जड जाते हे सत्य आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाने कधीच आणि कोणतीच निवडणूक सोपी म्हणून स्वीकारू नये असा आम्हाला पाठ पढवल्याने, या निवडणुकीला आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारले आहे. मागील पाच वर्षात आमच्या हातात दिलेली सत्ता आम्ही सकारात्मक दृष्टीने सांभाळली, म्हणूनच मतदार आमच्यावर खुश आहेत. या निवडणुकीत ही सर्व सुज्ञ मतदार आमच्या बाजूने कौल देऊन आम्ही केलेल्या कामाची पोच देतील आणि पुढील कार्यकाळात आम्हाला पुन:श्‍च एकदा खालापूरची अस्मिता जपण्यासाठी संधी देतील असा विश्‍वास मला वाटतो.

या निवडणुकीत तुम्ही किती जगावर विजय मिळवाल असा तुम्हाला विश्‍वास वाटतो?
संतोष जंगम : मागील निवडणुकीत प्रचार करताना आम्ही मतदारांना विकास कामे करू असे आश्‍वासन दिल्यानंतर जर ते आमच्या बाजूने बहुमत देत असतील, तर… गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या बळावर मतदार आमच्या सर्वच उमेदवारांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालतील असा विश्‍वास नव्हे तर खात्री आम्हाला वाटते आहे.

Exit mobile version