यजमान अहिल्यानगरचा दमदार विजय

| अहिल्यानगर | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र खो-खो असो.च्या मान्यतेने बुन्हाणनगर येथील श्री बाणेश्वर विद्यालय येथे सुरू झालेल्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी साखळी सामन्यांत दमदार कामगिरीची आतषबाजी पाहायला मिळाली. मुलांमध्ये यजमान अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर तर मुलींच्या गटात मुंबई उपनगर यांनी प्रभावी विजयांसह पुढे चाल केली.

अक्षय शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण बुऱ्हाणनगर व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 24 जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून 4 ते 7 डिसेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत. यावेळी मुलींच्या गटात बलाढ्य धाराशीवने परभणीवर 1 डाव 3 गुणांनी विजय संपादन केला. सांगलीने बीडवर 1 डाव 6 गुणांनी विजय मिळवला. सोलापूरने लातूरवर 1 डाव 9 गुण राखत विजय मिळवला. ठाणे संघाने सिंधुदुर्गवर 24 गुणांनी विजय संपादन केला. मुंबई उपनगर संघाने नांदेड वर 1 डाव 6 गुणांनी विजय मिळवला. तर, रत्नागिरीने जालना संघावर 1 डाव 9 गुणांनी (16-7) मोठा विजय मिळवला.

पहिल्या दिवशी झालेल्या किशोरांच्या गटातील सामन्यात धाराशिवने 1 डाव 6 गुणांनी पालघरवर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सांगली संघाने छत्रपती संभाजी नगरचा 1 डाव 6 गुणांनी पराभव केला. सोलापूरने सिंधुदुर्गवर 1 डाव 21 गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाने लातूरचा 1 डाव 16 गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगर संघाने परभणीवर 1 डाव 9 गुणांनी विजय मिळवला. तर, बलाढ्य ठाणे संघाने हिंगोलीवर 1 डाव 18 गुणांनी मात केली. नाशिकच्या संघाने जळगाव वर 1 डाव 9 गुणांनी विजय मिळवला.

Exit mobile version