भारताचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेचा 116 धावांत खुर्दा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप-आवेश आणि साई-श्रेयसने मोलाचे योगदान दिले. अर्शदीप सिंगने पाच, तर आवेशने चार गडी बाद करीत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा 116 धावांत खुर्दा उडवला.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. तगड्या दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 116 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी हे आव्हान अवघ्या 16.4 षटकांमध्ये पार करत मोठ्या विजयाची नोंद केली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने पहिल्याच सामन्यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवताना नाबाद 55 धावांची खेळी केली, तर त्याला श्रेयसने 52 धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. त्यामुळे भारतीय पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघ्या पाच धावांवर बाद झाला. श्रेयस अर्धशतक करून बाद झाल्यानंतर विजयाची औपचारिकता साई सुदर्शन आणि तिलक वर्माने पूर्ण केली.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताचा या वर्षातील एकदिवसीय सामन्यातील हा 26 वा विजय आहे. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने 26 सामने जिंकले होते. कांगारू संघाने 2023 मध्ये 30 सामने जिंकले आहेत. आफ्रिकन संघाचा पराभव करत भारताने मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पाच वर्षांनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामना जिंकला आहे. भारतीय संघाने शेवटचा 2018 मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2022 मध्ये सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.

Exit mobile version