। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अकराव्या दिवशी कर्णधार ऋतुराज गायकवाड (89) व अभिमन्यू जाधव (नाबाद 65) यांनी केलेल्या झंझावती भागीदारीसह सचिन भोसले (4/16) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 4 एस पुणेरी बाप्पा संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर डकवर्थ लुईस पद्धतीने 59 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या स्पर्धेत नाशिक संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वरच्या फळीतील पवन शहा (12), यश क्षीरसागर (3), रोहन दामले (20) हे झटपट बाद झाले. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अभिमन्यू जाधव व ऋतुराज गायकवाड या आक्रमक फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 76 चेंडूत 151 धावांची भागीदारी केली. हि भागीदारी या मौसमातील विक्रमी भागीदारी ठरली. पुणे संघाने निर्धारित षटकात 4 बाद 210 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान घेऊन उतरलेल्या नाशिक संघाला हे पेलवले नाही. नाशिक संघ 10 षटकात 5 बाद 51 अशा स्थितीत असताना पाऊस सुरु झाला. यावेळी नाशिक संघ डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पिछाडीवर होता. पावसाच्या व्यत्ययामुळे 4 एस पुणेरी बाप्पा संघाने डकवर्थ लुईस पद्धतीने 59 धावांनी विजय मिळवला.