। सुधागड-पाली । वार्तााहर ।
सुधागड तालुक्यातील पोटलज फाटा येथे रविवारी (ता.17) रात्री अकराच्या सुमारास एका रिक्षावाल्याला चार जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत पाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक प्रमोद गुजर (वय 39) हे खोपोलीवरून रिक्षा घेऊन एकटेच बहिरीचीवाडी (पोस्ट भिरा, तालुका माणगाव) येथे जात होते. यावेळी पाली नांदगाव रस्त्यावर पोटलज फाटा येथे आले असता चार अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा अडवली आणि पेट्रोलसाठी पैसे मागितले.
यावेळी रिक्षा चालक प्रमोद गुजर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता या चार इसमानी प्रमोद गुजर यांना रिक्षातून बाहेर रस्त्यावर खेचले आणि रस्त्याच्या बाजूला झाडाजवळ नेऊन खाली पाडले. तसेच सर्वांनी मिळून त्यांचे डोके रस्त्यावर आपटून दुखापत केली. तसेच रिक्षाचालक प्रमोद गुजर यांच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून त्यातील तीन हजार रुपये काढले व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून घेतला. या गुन्ह्यातील दोन आरोपींना सोमवार (ता.18) दुपारी तीनच्या सुमारास पाली पोलिसांनी अटक केली आहे