पर्यावरणप्रेमींचा संतप्त सवाल
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील शिघ्रे नदीत गणपती विसर्जन, देवी विसर्जन करण्यात येते. या नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते; परंतु, सध्या याच नदीत काही नागरिकांकडून घाण, कचरा टाकून नदीला इंम्पिंग ग्राऊंड बनवले आहे. यामुळे नदीपात्रात दुर्गंधी पसरली असून, पाणीदेखील दूषित झाले आहे. या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शिघ्रे नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्लास्टिच्या पिशव्या, घाण-कचरा, उरलेले अन्न, कोंबडीची पिसे नदीत फेकत असल्यामुळे पाणी दूषित होत आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नदीचे संरक्षण व संवर्धन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
दरम्यान, याबाबत शिघ्रे ग्रामपंचायत सरपंच गुलाब वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या की गेल्या शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीत डंपिंग ग्राऊंडसाठी जागा नसल्याने काही लोक या ठिकाणी कचरा टाकत असतील. डंपिंग ग्राऊंडसाठी जागा मिळावी त्याकरिता मुरुड तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे; परंतु अद्याप काहीच निर्णय दिलेला नाही. स्वच्छता राखण्यासाठी नदीपात्रात कोणीही कचरा फेकू नये, अन्यथा त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल.