आरसीबीची नाईट रायडर्सवर माज
। कोलकाता । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रजत पाटीदारच्या नेतृत्वात दणक्यात केली आहे. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभवाचा धक्का त्यांनी दिला. बंगळुरूने ईडन गार्डन्सला झालेला हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाताच्या क्विंटन डी कॉक (4) पहिल्याच षटकात बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी शतकी भागीदारी केली. त्यात रहाणेने देखील अर्धशतक केले. परंतु, हे दोघे बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव कोसळला. नंतर केवळ अंगकृश रघुवंशीकडून चांगली झुंज पाहायला मिळाली. नरेनने 26 चेंडूत 44 धावांची खेळी केली. रहाणेने 31 चेंडूत 56 धावा केल्या. तसेच, अंगकृश रघुवंशीने 30 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला 20 षटकांत 8 बाद 174 धावा करत्या आल्या. बंगळुरूकडून कृणाल पांड्याने 3 बळी घेतले. तसेच, जोश हेजलवूडने 2 बळी, तर यश दयाल, रसिख सलाम आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली हे दोघे उतरले होते. सॉल्टने आक्रमक खेळ करत अर्धशतकही झळकावले. मात्र, सॉल्टला वरुण चक्रवर्तीने 9 व्या षटकात माघारी धाडले. सॉल्टने 31 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने रजतची साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पडिक्कल 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने मात्र विराटला भक्कम साथ दिली. यादरम्यान विराटनेही अर्धशतक पूर्ण केले. मात्र, बंगळुरू विजयाच्या जवळ असताना पाटीदार 16 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. अखेर लियाममलिव्हिंगस्टोनने आक्रमक खेळत विराटच्या साथीने बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लिव्हिंगस्टोन 5 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तर, विराट 36 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. विशेष म्हणजे विराटचा हा 400वा टी-20 सामना आहे. तो रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकनंतर 400 टी सामने खेळणारा तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. कोलकाताकडून वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
विराट कोहली
36 चेंडू
4 चौकार
3 षटकार
59 धावा