मोटारसायकल स्वारांनी केला पाठलाग; प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
। औरंगाबाद । प्रतिनिधी ।
प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला खंडाळानजीक आग लागल्याची घटना सोमवारी घडली. वेगाने धावणार्या एसटीला आग लागल्याची घटना घडली. दोन तरुणांनी मोठ्या प्रयत्नाने चालकाला माहिती दिल्याने या बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. तरुणांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती वैजापूर पोलिस ठाण्यासह अग्निशमन दलास कळवण्यात आली होती. काही वेळातच दोन्हीही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत बसमधील आग नियंत्रणात आणण्यात यश आले होते.
वाशीम-नाशिक ही एसटी बस (एमएच 40 वाय 5661) नाशिककडे जात असताना खंडाळानजीक बसच्या पाठिमागून अचानक धूर निघायला लागला. काही वेळातच बसने पेट घेतला व आगीचे लोळ बाहेर पडताना दिसू लागले. त्याचवेळी वैजापूर येथील माजिद शेख व सचिन साकला हे दोघेजण दुचाकीवरून खंडाळा येथून वैजापूरकडे येत होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी बसचा पाठलाग सुरू केला.
एसटी बसचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे अवघड जात होते. बसने मागून पेट घेतला. परंतु चालकाला त्याची कल्पनाही नव्हती. या दोघांनी कसाबसा पाठलाग करून बस शहरानजीकच्या रोटेगाव उड्डाणपुलावर थांबवून चालकाला ही माहिती दिली. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून सर्वप्रथम 30 प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. यानंतर अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.