उरणमध्ये बिल्डरांचा उच्छाद

खासगी रस्ते गिळायला सुरुवात; प्रशासनाकडून बघ्याची भूमिका

| उरण | प्रतिनिधी |

उरणमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरांनी रस्ते, मोकळ्या जागा गिळायला सुरुवात केली आहे. नव्या इमारती उभ्या करताना बिल्डरांनी खासगी रस्त्यांवरही बिनधास्त अतिक्रमण चालवले असून, रहिवाशांच्या जीवनाचा पार बट्ट्याबोळ केला जात आहे. तक्रारी करूनही उरण नगरपालिका प्रशासन कानठळ्या बसवून गप्प बसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. बिल्डरांच्या पैशाच्या घोड्यावर प्रशासन धडधडत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

मुख्य रस्त्यावर डंपर लावून माती साठवली जाते. त्यातील माती रस्त्यावर विखुरली जाऊन जाड थर साचले आहेत. त्यामुळे बाईकस्वारांचे प्राण धोक्यात आले असून, गंभीर अपघात कधीही घडू शकतो. बांधकामाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण, अवजड वाहनांची वर्दळ यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सकाळ-संध्याकाळचा निवांत वेळ, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तास, आजारी लोकांची विश्रांती, सगळंच धुळीला मिळालंय.

उरणमध्ये मोठमोठ्या टॉवर्सचं पुनर्विकास धडाक्यात सुरू असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. भविष्यात पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करणार, याची कोणालाच चिंता नाही. अधिकारी मात्र खुर्चीत बसून डोळेझाक करताहेत. बिल्डरांच्या मनमानीला आणि प्रशासनाच्या उदासीनतेला चपराक देण्यासाठी उरणकरांनी आता तक्रारी, आंदोलनं आणि गरज पडली तर न्यायालयीन कारवाईचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला आहे.

Exit mobile version