17 रुपयांची साडी; दोन कोटींची गाडी

| मुंबई | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे. युती आणि आघाड्यांकडून प्रक्रिया वेगाने सुरु आहे. महाविकास आघाडी असो, की महायुती असो दोन्ही युती आणि आघाडीत कुरघोडी सुरु आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. आ. बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार खा. नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यासाठी वेळप्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण राणांसाठी मत मागणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांना मांडली. तसेच त्यांनी महायुतीला धक्का देत प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली. आता या सर्व प्रकरणात नवनीत राणांवर घणाघाती हल्ले ते करत आहेत. यामुळे अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच वातावरण तापलं आहे.

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. आपण दोन कोटींच्या गाडीत फिरायचे आणि 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही 17 रूपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असा खरपूस समाचार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचा घेतला. राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. नवनीत राणाचा डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत. आता तीर दूर गेलेला आहे. तो वापस येणार नाही, असे ते म्हणाले.

Exit mobile version