। खोपोली। प्रतिनिधी।
खोपोली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका रिक्षाचालकाने आपल्या अल्पवयीन मुलीच्या हातात भररस्त्यावर रिक्षाचे स्टेअरिंग दिल्याची घटना समोर आली असून, या बेफिकीर कृतीमुळे केवळ रिक्षातील मुलांच्याच नव्हे तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. ही घटना मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील गुडलक चौकाजवळ घडली. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी खोपोली येथील रिक्षाचालक मिंलीद गायकवाड (43) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी त्यांच्या मालकीची ऑटो रिक्षा त्यांच्या अल्पवयीन मुलगी संचिता हिच्याकडे चालविण्यास दिली. मुलीकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्यांनी हा धोकादायक प्रयोग केला. त्या वेळी रिक्षामध्ये तीन ते चार शाळकरी मुली मागच्या सीटवर बसलेल्या होत्या. भररस्त्यावर सुसाट धावणाऱ्या या रिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक बाजूला बसून मुलीला मार्गदर्शन करताना दिसतो आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाळकरी मुलीच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग
