। पॅरिस । वृत्तसंस्था ।
ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आयोजन समितीला परदेशी खेळाडू आणि संघातील सदस्यांकडून क्रीडा नगरीत आणि केंद्रांवर मूलभूत सुविधांच्या अभावामुळे तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. ग्रेट ब्रिटन पथकाच्या प्रमुखाने पहिल्या दिवसापासून योग्य अन्नाच्या अभावाचा मुद्दा उपस्थित केला. ग्रेट ब्रिटनच्या कितीतरी खेळाडूंना रात्रीच्या जेवणाविना राहावे लागले. त्यामुळे स्पर्धेच्या बाकी कालावधीसाठी त्यांच्या प्रथक प्रमुखाला खेळाडूंच्या स्वयंपाक गरजा पूर्ण करण्यासाठी तातडीने मायदेशातून स्वयंपाकी पाचारण करणे भाग पडले. एका क्रीडापटूने सांगितले की, जेव्हा खेळाडू त्यांच्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन क्रीडा नगरीत आले, तेव्हा त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध नव्हते. जेव्हा आम्ही यासंदर्भात आयोजन समिती अधिकारी किंवा स्वयंसेवक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्यापाशी उत्तर नव्हते. आयोजन समितीने या मूलभूत बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे, असे या खेळाडूने सांगितले. आणखी एक खेळाडू म्हणाला की, आम्हाला आमच्या गरजा विशद करणे कठीण ठरत आहे. एका स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूलाही ज्याचे मी नाव उघड करणार नाही, त्यालाही जेवण मिळाले नाही. आमच्यासाठी हे धक्कादायक आहे.







