महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

अडीच वर्षांत 419 अपघातांत 160 जणांचा बळी; मुंबई-गोवा महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

| रायगड | प्रमोद जाधव |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन अठरा वर्षे पूर्ण झाली; मात्र आजही हा मार्ग अपूर्णावस्थेतच आहे. निकृष्ट दर्जाचे सर्व्हीस रोड, दिशादर्शकांचा अभाव, अपुरी विद्युत सेवा अशा अनेक कारणांमुळे निष्पापांचे प्राण जात आहेत. पेण, वडखळ, नागोठणे, सुकेळी खिंड, माणगाव, महाड व पोलादपूर परिसरातील या क्षेत्रात अपघातांची मालिकाच सुरू आहे. 2024 पासून आतापर्यंत 419 अपघात झाले असून, यामध्ये 160 जणांना जीव गमवावा लागला आहे. कोकणवासियांसह पर्यटकांसाठी हा विकास मरणयातना ठरत असल्याचे चित्र आहे. मृत्यूचा सापळा कधी बंद होणार, असा सवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाला जनतेकडून विचारला जात आहे.

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकीकरणदेखील वाढू लागले आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह कोकणातील पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार व रविवारी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी कोकणासह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळी पर्यटक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची कायमच मोठी वर्दळ असते.

रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित 29 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांपैकी 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जिल्ह्यामध्ये 40हून अधिक ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) आहेत. त्यात द्रुतगती महामार्गावर आठ, राष्ट्रीय महामार्ग 66 वर 25, राष्ट्रीय महामार्ग 48 वर पाच, राष्ट्रीय महामार्ग 548 अ वर तीन, राष्ट्रीय महामार्ग 166 ए आणि डी वर तीन, राष्ट्रीय महामार्ग 753 एफवर एक या अपघात प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66च्या हद्दीत सर्वात जास्त प्रवण क्षेत्र आहेत. या मार्गांवरून वाहनांची वर्दळ कायमच असते. खारपाडा ते पोलादपूर या रायगड जिल्ह्यातील 126 किलोमीटरच्या मार्गावर 25 अपघात प्रवण क्षेत्र आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग पूर्वी अरुंद व डांबरी होता. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर 2008 पासून या महामार्गाचे काम सुरू झाले. डांबरी रस्त्याच्या जागी सिमेंट काँक्रीटचा चारपदरी रस्ता तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र या ब्लॅक स्पॉटवर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

पेणपासून पोलादपूरपर्यंत असलेल्या या ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण क्षेत्रात अडीच वर्षांत 419 अपघात झाले. त्यामध्ये 2024 मध्ये 157, 2025 मध्ये 160 आणि 2026 मध्ये आठ महिन्यांत 102 अपघातांचा समावेश आहे. या तीन वर्षांत दरवर्षी मृतांची संख्या 50 पेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेकडो बळी घेणारे राष्ट्रीय महामार्ग अजून किती बळींची वाट पाहणार, असा सवाल रायगडसह कोकणवासियांकडून विचारला जात आहे.

ब्लॅक स्पॉटवर दृष्टिक्षेप (राष्ट्रीय महामार्ग-66)
दादर सागरी-खारपाडा पूल, दादर सागरी-खरोशी फाटा, पेण-तरणखोप, पेण-रामवाडी, पेण-वाशीफाटा, वडखळ-डोलवी, नागोठणे -सुकेळी खिंड, नागोठणे-शेतपालस, कोलाड-पुई, माणगाव-कशेणे, माणगाव-ढालघर, माणगाव-तिलोरे, गोरेगाव-रेपोली, गोरेगाव-लोणेरे, गोरेगाव-टेमपाले, गोरेगाव-तळेगाव पेट्रोल पंपकडील बाजू, गोरेगाव-लोणेरे बसस्थानक, महाड शहर-टेमपाले ते लाखपाले ते पहेल, महाड शहर-गांधारपाले, महाड तालुका-वीर, महाड शहर-दासगाव, पोलादपूर-धमणदेवी, पोलादपूर-लोहारे, पोलादपूर-पार्ले, पोलादपूर-चोलई.
वाहनतळ निर्मितीचा प्रश्न कायमच
रायगड जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणासह पर्यटनामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. रस्ते रुंदीकरणाची कामे जिल्ह्यात होत असली, तरीदेखील वाहनतळ निर्मितीचा प्रश्न कायमच आहे. जिल्ह्यातील महामार्गावर वाहनतळ निर्मितीचा अभाव असल्याने वाहन पार्किंग करताना चालकांना अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
मुंबई-गोवा महामार्गासह वेगवेगळ्या मार्गावरील रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, या महामार्गावरील चारपदरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सर्व्हीस रोडसह ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गासह मुंबई-पुणे द्रुतगती, राष्ट्रीय महामार्गावरील काही वळणाच्या ठिकाणी सुसाट वाहने चालविली जातात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविल्याने अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागतो. तर काहींना जखमी होऊन कायमचे अपंगत्व प्राप्त होते. अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. ठिकठिकाणी वाहतुकीचे दहा सुवर्ण नियम फलकाद्वारे चालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय महामार्ग विभागाला सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.

सचिन पवार
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा
Exit mobile version