गरीबांना केंद्रबिंदू मानणारा शेकाप

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे गौरवोद्गार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी, कामगार, कष्टकरी आदी शेवटच्या घटकांपर्यंत काम करणारा पक्ष आहे. गोरगरीब, गरजूंच्या मदतीला धावणारा पक्ष आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांच्यानंतर चौथी पिढी जनतेच्या हितासाठी काम करीत आहे, त्याचा मनस्वी आनंद आहे, असे गौरवोद्गार शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी काढले.

1 / 7



शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील गरजू, गरीबांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तीन तालुक्यांतील 14 जणांना नवे घर व घराची डागडुजी करण्यासाठी मदतीचा हात चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला. हा कार्यक्रम शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला.

2 / 8

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते द्वारकानाथ नाईक, गुरूनाथ मांजरेकर, पुरोगामी युवक संघटना, शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गरीब गरजूंना मदतीचा हात देण्याच्या कार्यक्रमाच्यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील म्हणाले, शेतकरी कामगार पक्ष हा वैचारिक जडणडघडणीतून तयार झालेला पक्ष आहे. शेकापची एक वेगळी ध्येय धोरणे आहेत. शेतकरी कामगार पक्षाने कष्टकरी, कामगार, गरीबांना केंद्रबिंदू मानत काम केले आहे. त्यांच्याशी बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे. गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे. यातून रायगड जिल्हा सुफलाम् करण्याचा मानस पूर्ण होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

गरजूंना मिळणार हक्काचे घर
सर्वसामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी उभे राहणे हे शेतकरी कामगार पक्षाचे कर्तव्य आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील यांनी गरीबांशी बांधिलकी जपली. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणा व प्रोत्साहनातून गोरगरीबांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले जात आहे. त्याचा आनंद आहे. आज शासनाच्या एक पाऊल पुढे जात सामाजिक बांधिलकीतून गरजूंना नव्या घरासह दुरुस्तीसाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा खर्‍या अर्थाने आनंद आहे. ही परंपरा अशीच चालू ठेवू, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
Exit mobile version