छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडणार
। ठाणे । प्रतिनिधी ।
घोडबंदर येथील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याजवळ शिवसृष्टी प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार असून, तसा प्रशासकीय ठराव पालिकेने मंजूर केला आहे. घोडबंदर किल्ला हा मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागूनच आहे. शिवाय हा परिसर मुंबई आणि ठाणे या मोठ्या शहरांना लागूनच असल्यामुळे शिवसृष्टी उभारल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक या किल्ल्यााला भेट देण्याची शक्यता आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैली विषयी अधिक माहिती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
घोडबंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या शासकीय 9 एकर जागेत किल्ल्याच्या तटबंदीपासून 35 मीटर अंतर सोडून हा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती देणारी वास्तू उभारली जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी 54 कोटी रुपये खर्चाचा अहवाल राज्य शासनाला पालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. त्यालप तीन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे.त्यावरून संपूर्ण प्रकल्प खर्च शासनामार्फत उचलला जाणार आहे. याबाबतचे शासन आदेश 5 सप्टेंबर 2024 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 20 कोटी 32 लाख 52 हजार रुपये कामाच्या खर्चास मिरा- भाईंदर महापालिकेकेकडून प्रशासकीय ठराव करून मंजुरी देण्यात आली आहे. मे बिलीव्ह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत.तर लवकरच हे काम सुरु होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाराजांचे भव्य मंदिर उभारणार
या शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर या शिवसृष्टी प्रकल्पात उभारले जाणार आहे. तसेच, घोडबंदर किल्ल्यालगत शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यास पुरातत्त्व व पोलीस विभागाकडून ना हरकत दाखला देण्यात आला आहे. ही जागा अतिसंवेदनशील क्षेत्र व खारफुटीने बाधित असल्याने आवश्यक परवानगीसाठी पालिकेने प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सुरुवातीला काही कारणास्तव फेटाळण्यात आला होता. त्यामुळे पालिकेने पुन्हा काही बदल करत फेरप्रस्ताव सादर केला. त्याला नुकतीच पर्यावरण विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.