ठाकरे गटाला धक्का! पाच न्यायमूर्ती घटनापीठाकडूनच प्रकरणाची सुनावणी

पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था |

उद्धव ठाकरे गटाची हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे देण्याची मागणी नाकारत सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे राहणार आहे.

ठाकरे गटानं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. आणि हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं अशी विनंती घटनापीठाकडे केली होती. या प्रकरणावर गेले तीन दिवस सलग सुनावणी झाली, अखेरीस आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन केले. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे राहणार आहे. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नाही, त्यामुळे हे प्रकरण पाच न्यामूर्तींच्या खंडपीठकडे राहणार आहे. 21 आणि 22 फेब्रुवारीला याची नियमित सुनावणी होणार आहे.

सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात 20 जून 2022 पासून आले आहे. 8 महिने झाले तरी या केसमध्ये अद्याप एकही निर्णय, आदेश नव्हता. आधी दोन न्यायमूर्तींचं व्हेकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ. केवळ बेंच बदलत आहे. त्यानंतर आजचा निर्णय हा महत्त्वपूर्ण मानला जातो. महराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण ज्या गतीने सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यावरून एप्रिल किंवा मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version