| अहमदनगर | वृत्तसंस्था |
काहीवेळा किरकोळ वादातून थेट हत्या किंवा हत्येचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यापर्यंतच्या घटना घडतात. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात 10 रुपयांच्या फाटक्या नोटवरुन झालेल्या वादातून चक्क दुकानच जाळल्याची घटना उघडकीस आली आहे.
अहमदनगर-पुणे रोडवरील कोठी येथे रंजना बसापुरे यांच्या मालकीचे महावीर दूध डेअरी व जनरल स्टोअर्स आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या डेअरी व जनरल स्टोअर्सचे दुकान चालवतात. याप्रकरणातील आरोपी विजय झेंडे हा रविवारी दुपारी त्यांच्या दुकानात आला होता. त्यावेळी, त्याने खिशातून दहा रुपयांची नोट दुकानदार महिलेस दिली. मात्र, ही नोट फाटकी होती. दुकानदाराने 10 रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व दुकानदारामध्ये वाद झाले.
आरोपी विजयने फाटकी नोट न घेतल्याच्या कारणावरून झालेला वाद मनात ठेवला. त्याच दिवशी रात्री 10 वाजताच्या सुमारास आरोपीने ऑइलच्या सहाय्याने संबधित दुकानाला आग लावली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, दुकानदाराचे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.