बाळाराम पाटील, प्रीतम म्हात्रे, अतुल म्हात्रेंचे उदमेदवारी अर्ज दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेल मतदारसंघात माजी आमदार बाळाराम पाटील, उरण मतदारसंघातून प्रीतम म्हात्रे आणि पेण मतदारसंघातून अतुल म्हात्रे या तीन शिलेदारांनी अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी, (दि. 29) रोजी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी अलिबाग येथील सभेत अलिबाग, पनवेल, पेण, उरण मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृतरित्या घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. 25) अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, आज पनवेल मतदारसंघातून माजी आ. बाळाराम पाटील, उरण मतदारसंघातून प्रीतम म्हात्रे आणि पेण मतदारसंघातून अतुल म्हात्रे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे विकासाचे व्हिजन असलेला पक्ष म्हणून रायगडची जनता शेतकरी कामगार पक्षाकडे पाहात आहे. त्यामुळे मतदारांचा शेकापच्या सर्व उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, उद्या दि. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर खर्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.