| मुंबई | प्रतिनिधी |
ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने दि. 14 ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत हंगामातील पहिल्या व्यवसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या 2 क्रीडागणावर ही स्पर्धा सायं. सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. भारत पेट्रोलियम, युवा पलटण, मध्य रेल्वे, युनियन बँक, मुंबई बंदर, न्यू इंडिया एन्शुरन्स, मुंबई पोस्टल, सी. जी. एस. टि., पश्चिम रेल्वे, रूपाली ज्वेलस, सचिवालय जिमखाना, स्वामी समर्थ स्पोर्टस् या मुंबईतील व्यावसायिक संघा बरोबर डी. पी. यु. पुणे, ठाणे महानगर पालिका, एच. ए. एल. नाशिक आदि नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविली जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने संघ व खेळाडूंच्या कौशल्यावर रोख रकमे बरोबरीने आकर्षक भेटवस्तूंची लयलूट करण्यात आली आहे. अंतिम विजयी होणाऱ्या संघास रोख रु. एक लाख पन्नास हजार(150000) व चषक, तर उपविजयी संघास रोख रु. एक लाख(100000) व चषक प्रदान करण्यात येईल. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रु. पन्नास हजार(50000) व चषक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस मोटर बाईक बहाल करण्यात येईल. तर स्पर्धेत उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी वॉशिंग मशिन बक्षीस दाखल देण्यात येईल. प्रत्येक दिवसाचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूस एल.ई.डी. टी. व्ही. प्रदान करण्यात येईल. सामनावीर ठरणाऱ्या प्रत्येक खेळाडूस ट्रॉली बॅग बक्षीस देण्यात येईल. सामना पहाण्यास येणाऱ्या क्रीडा रसिकाना खूष करण्यासाठी प्रतिदिनी 5 लकी ड्रॉच्या सोडत काढण्यात येतील. अशी माहिती मंडळाचे सचिव रोहित वारेकर यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमाना दिली.







