उद्या हिंदू धर्मियांचा मूकमोर्चा

हिंदू महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध हिंदू एकवटले

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील बोरगाव येथील तरुणीची छेड काढण्यात आली होती. त्याबद्दल त्या मुस्लिम धर्मीय तरुणांना जाब विचारण्यात आल्यानंतर मुस्लिम तरुणांनी त्या संबंधित तरुणीच्या भावाला बेदम मारहाण केली होती. त्याविरुद्ध आणि उरण तसेच नवी मुंबई येथील हिंदू धर्मीय महिलांवर झालेल्या अत्याचार विरोधात नेरळ पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा निघणार आहे. 11 ऑगस्ट रोजी नेरळ पोलीस ठाण्यावर कर्जत तालुक्यातील हिंदू धर्मियांचा मुकमोर्चा काढण्यात येणार आहे.

2 ऑगस्ट रोजी नेरळ येथील सीएनजी पंपावर दामत येथील चार मुस्लिम तरुणांनी बोरगाव येथील तरुणीची अश्‍लील हावभावकरून छेड काढली आणि नंतर त्या तरुणीच्या भावाला लोखंडी हत्याराने मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आगरी समाज हॉल येथे समस्त हिंदूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तालुक्यातील दोनशेहून अधिक तरुण उपस्थित होते. नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे या विवाहितेवर हिंदू मंदिरात अत्याचार करून तिला ठार करण्यात आले. तर उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीवर अत्याचार करून तिच्या शरीराचे भाग वेगवेगळे करण्याची संतापजनक घटना घडली आहे. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी नेरळमध्ये आयोजित बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर कर्जत तालुक्यातील सर्व हिंदू धर्मीय यांनी 11 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यात हिंदू धर्मीय मुक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

मुकमोर्चा नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथून निघणार आहे. पुढे लोकमान्य टिळक वाचनालय येथून हुतात्मा हिराजी पाटील चौक असा माथेरान-नेरळ रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक असा हुतात्मा भाई कोतवाल चौक, नेरळ स्टेशन येथून टॅक्सी स्टँड खांडा गावातून कल्याण-कर्जत रस्त्याने नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचेल. तेथे निवेदन देण्यात आल्यानंतर नेरळ गावातील बापूराव धारप सभागृहात मोर्चात सहभागी हिंदू धर्मीय यांची सभा होणार आहे. या मुकमोर्चासाठी कर्जत आणि नेरळ येथील हिंदू धर्मीय यांच्याकडून नियोजन सुरू आहे. नेरळमधील या मुकमोर्चाबद्दल हिंदू धर्मीय यांच्यावतीने नेरळ पोलीस ठाणे येथे जावून मोर्चाची परवानगी मागितली आहे. त्या मोर्चाला परवानगी मिळाली असून नेरळमध्ये रविवारी सकाळी 10 वाजता हजारो हिंदू एकवटतील असे बोलले जात आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला एकत्र आणण्याचे प्रयत्न आयोजकांचा सुरू असून बोरगावमधील ग्रामस्थ आणि परिसरातून शेकडो लोक सहभागी होतील, असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version