महाड क्रांतीभूमीत एकच विचारपीठ

चवदार तळे स्मृतीदिनी विविध कार्यक्रम

| महाड | प्रतिनिधी |

महाड या ऐतिहासिक भूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली. या घटनेचा स्मृतिदिन गेली अनेक वर्ष साजरा केला जात आहे. मात्र याठिकाणी विविध पक्ष आणि संघटना वेगवेगळे तंबू ठोकून कार्यक्रम करत आहेत. यामुळे अनेकवेळा वादविवाद तर प्रचंड गोंधळाचे चित्र निर्माण झाले होते. महाड क्रांती भूमितून बाबासाहेबांनी सामाजिक समतेचा विचार देश आणि देशाबाहेर नेला. हाच सामाजिक समतेचा विचार एक मंचावर मांडण्याकरिता सन 2018 मध्ये तरुण पिढी पुढे आली होती. मात्र कांही राजकीय वादामुळे हा विचार मागे पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा एक विचारपीठ उभे केले जाणार आहे.

सामाजिक क्रांतीचा स्मृतिदिन प्रतिवर्षी साजरा केला जातो. मात्र आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना हा कार्यक्रम आपापल्यापरीने महाड मध्ये साजरा करतात. यामुळे या स्मृतिदिनाला देशभरातून आलेल्या भीम सैनिकांची मोठी पंचाईत होते. महाड मध्ये सालाबादप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, या प्रमुख राजकीय संघटनाबरोबर अनेक गट तट आणि विविध सामाजिक संघटना आपापल्यापरीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करतात. मात्र हे चित्र महाड क्रांतिभूमीमध्ये विचित्र दिसते. विविध ठिकाणी उभ्या केलेल्या तंबूमुळे ऐक्य दिसून येत नाही. यामुळे प्रशासनावर देखील प्रचंड ताण निर्माण होतो. स्थानिक तरुणानी याला बगल देण्याचे ठरवून सन 2018 मध्ये सर्व नेत्यांनी आपला विचार एकाच मंचावर मांडावा अशी भूमिका घेतली होती. एक मंच एक विचाराच एल्गार या तरुणांनी पुकारून 20 मार्चला देशातील आंबेडकरी विचारांच्या नेत्यांनी आणि अनुयायांनी यामध्ये सहभागी होवून एक चांगला संदेश महाड क्रांतीभूमितून द्यावा, अशी भूमिका मांडली होती. मात्र कांही राजकीय नेत्यांनी याला विरोध करत स्वतंत्र मंडप उभे केले. यावर्षी मात्र क्रांतिभूमी संवर्धन समिती स्थापन झाली असून त्यामाध्यमातून क्रांतीस्थंभावर एकच मंडप उभा केला जाणार आहे. एकाच विचार मंचकावर सर्वच नेते एकाचवेळी उपस्थित राहणार नसले तरी पुढील वर्षी असा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका समितीच्या पदाधिकार्‍यांनी मांडली. यावेळी विनायक हाटे, रिपब्लिकन पार्टीचे मोहन खांबे, लक्ष्मण जाधव, प्रभाकर खांबे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपली भूमिका मांडताना समितीचे अध्यक्ष विनायक हाटे यांनी 19-20 मार्च रोजी निर्माण होत असलेल्या वातावरणावर नाराजी व्यक्त केली. स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारचे नियोजन करत नाही. यामुळे देशभरातून येणार्‍या महिलांचे हाल होत असतात. जागोजागी वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो. याशिवाय सामाजिक समतेचा विचार मांडण्यासाठी अनेक मंच याठिकाणी उभे राहतात आणि कोण काय सांगतोय हे कळत नाही. बाहेरून आलेल्या भिमसैनिकांचे विचार ऐकायचे का, असा प्रश्‍न निर्माण होतो. कुठेतरी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज आहे आणि महाड क्रांतीभूमितून एक चांगला विचार गेला पाहिजे या उदात्त हेतूने आम्ही काम करत असल्याचे सांगितले.

समता मार्चचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज समाधी ते चवदार तळे समता मार्चचे आयोजन 19 मार्च रोजी देशाच्या विविध ठिकाणहून या कार्यक्रमाला लाखो भीमसैनिक दाखल होत असतात. 19 मार्च रोजी किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळावरून महाडच्या चवदारतळे पर्यंत समता मार्च काढण्यात येणार असल्याचे देखील या तरुणांनी सांगितले. या समता मार्चचा समारोप चवदारतळे या ठिकाणी होणार आहे. या मार्चमध्ये देखील मोठ्या संखेने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version