जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्लॅब कोसळला

शिवतीर्थाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेच्या दुसर्‍या मजल्यावरील आरोग्य विभागाच्या कार्यालयातील स्लॅब बुधवारी (दि.24) कोसळला. त्यावेळी एक महिला कर्मचारी खाली बसल्या होत्या. त्यांच्या अंगावर तो पडल्याने आरोग्य विभागात चांगलीच धावपळ झाली. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र पुन्हा एकदा शिवतीर्थ इमारतीमधील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शिवतीर्थ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून इमारत धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे इमारत तीन मजली आहे. मात्र टेरेसवर विविध विभागांची कार्यालये थाटण्यात आली आहेत. बर्‍याच कालावधीपासून ही कार्यालये कार्यरत आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार प्रशासन विभागाने अनधिकृत चौथ्या आणि तिसर्‍या मजल्यावरील अस्तित्वात असणारी सर्व कार्यालये तातडीने खाली करण्याचे लेखी पत्र दिले आहे. याला आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.

संबंधित विभागातील अधिकार्‍यांना कार्यालय खाली करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्यांनी ती अद्याप खाली केलेली नाहीत. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, कामानिमित्त येणार्‍या नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे.ही कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी अन्य जागा, इमारतीची व्यवस्था केली आहे. मात्र नवीन देण्यात आलेल्या जागा कमी आहेत. तसेच काही ठिकाणी अद्यापही लाईट, पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. स्वच्छतागृहाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. अशा ठिकाणी स्थलांतरित कसे व्हायचे, असा सवाल कर्मचार्‍यांनी उपस्थित केला.

आरोग्य विभागाचे कार्यालय तिसर्‍या मजल्यावर आहे. त्यांना नवीन जागा देण्यात आली आहे. मात्र ती जागा अतिशय कमी असल्याने अधिकारी, कर्मचारी, टेबल, खुर्च्या, कपाट, फाईली कोठे ठेवायच्या, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी राहून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवावे लागत आहे. तसेच शिक्षण विभागाचे कामकाज याच मजल्यावरुन चालवण्यात येते.

माध्यमिक विभागाने आपल्या सामानाची बांधाबांध करुन ठेवली आहे, तर प्राथमिक विभागाला देण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुविधांची वानवा असल्याने त्यांना नाईलाजास्तव त्याच मजल्यावर तळ ठोकून राहावे लागत असल्याची खंत कर्मचार्‍यांनी बोलून दाखवली.

तिसर्‍या मजल्यावर एक सभागृह देखील आहे. या ठिकाणी आज सकाळपासूनच बैठकींचा धडाका सुरु होता. मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. प्रशासकीय कामानिमित्त सातत्याने येथे बैठका सुरुच असतात.

यापुर्वीही आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात स्लॅब खाली कोसळला होता. त्यानंतर आता पुन्हा स्लॅब पडल्याने अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन कामकाज करत आहेत. प्रशासनाने तातडीने सर्व कर्मचारी आणि कामानिमित्त येणार्‍या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सुविधायुक्त असणार्‍या इमारतीमध्ये स्थलांतर करणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version