राजापूर बाजारपेठेवर मंदीचे सावट

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

| रत्नागिरी | वार्ताहर |

रत्नागिरी जिल्ह्यातील गेले पंचवीस दिवस अर्जुना-कोदवली नद्यांना सातत्याने पूरस्थिती राहताना तब्बल चारवेळा राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले होते. या पूरस्थितीमुळे बाजारपेठेतील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

राजापूर बाजारपेठेमध्ये लावणीच्या हंगामामुळे मंदी होती. त्याचवेळी आलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भातशेतीच्या हंगामामुळे बाजारपेठेत आर्थिक मंदी आहे. तसेच, गेल्या पंचवीस दिवसांमध्ये सुमारे दहा ते पंधरा दिवस पुराची टांगती तलवार असल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. या पूरस्थितीमुळे सुमारे वीस-पंचवीस कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला की अर्जुना-कोदवली नदीच्या पाण्यामध्ये वाढ होऊन पुराचे पाणी बाजारपेठेत शिरते. त्यामुळे पावसाच्या वाढणारा जोर लक्षात घेऊन दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडते. या कालावधीत माल वाचिवण्याला प्राधान्य असल्याने ग्राहकांनाही चांगली सेवा देता येत नाही. या पूरस्थितीमुळे असलेल्या मंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या पंचवीस दिवसांमध्ये दहा ते पंधरावेळा शहरामध्ये पूरस्थिती आहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढालीला ब्रेक लागला आहे. आधीच पुरामुळे दुकाने बंद आहेत. त्यातच पूररेषेमुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही. या अस्मानी संकटाच्या दुष्टचक्रामध्ये व्यापाऱ्यांनी जगायचं कसं? बँकेच्या कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे?

राकेश पाटील, व्यापारी, राजापूर.
Exit mobile version