पुराचा धोका टाळण्यासाठी तोडगा काढावा

सरपंच चेतन जावसेन यांची मागणी

। कोर्लई । वार्ताहर ।

हवामानात वेळोवेळी सातत्याने होणारे बदल, चक्रिवादळ, ढगफुटी सदृश अतिवृष्टी यामुळे तसेच बोर्ली परिसरात स्टँड भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने बोर्लीतील पूराचा धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन जावसेन यांनी केली आहे.

नैसर्गिक परिस्थिती बरोबरच परिसरात झालेले भराव, पोखरलेले डोंगर, बंद झालेल्या मोर्‍या, बिनदिक्कतपणे नाल्यांवर झालेले बांधकाम याबाबत संबंधित बांधकाम तसेच महसूल विभागाला वेळोवेळी निवेदन देण्यात येऊनही दुर्लक्ष यामुळे गावाला पुराचा धोका वाढण्यात कारणीभूत ठरत असून याला कोठेतरी पायबंद घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.

आजची स्थिती पाहता पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी बोर्ली परिसरात कोठेही भराव करण्यात परवानगी देण्यापूर्वी पाण्याच्या वाटा लक्षात घेऊन, त्या बंद होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी, रामवाडी ते बोर्ली स्टँड रस्त्यावर काँक्रिटिकरण करण्यात येऊन मुख्य रस्त्यालगतचे नाले सहा फूट खोल व रुंद करण्यात यावेत, येथील दोन मोर्‍या पुर्ववत सुरू करण्यात याव्यात, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, मच्छिमारांच्या बोटींचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चेतन जावसेन यांनी केली आहे.

Exit mobile version