राज्यात ड्रग्जविरोधात विशेष अभियान राबवणार

देवेंद्र फडणवीसांची घोषणा

| पुणे | प्रतिनिधी |

युवा पिढीला नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची एक बैठक शनिवारी पुणे येथे झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची स्थिती आणि त्यावर पोलिसांचा प्रतिसाद, गुन्हेवाढीची कारणे याचा आढावा घेण्यात आला. आता नव्या सरकारमध्ये बदल्या आणि पोस्टिंगसाठी भ्रष्टाचाराला कुणालाही सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा पारदर्शी पद्धतीने काम करावे आणि दलाला पूर्वीचा नावलौकिक प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सागरी सुरक्षेच्या प्रस्तावांना तातडीने गती देण्याचेही निर्देश दिले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी द्याव्यात, तपासावरील देखरेखीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात यावी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील चांगल्या तपास पद्धतींचा स्वीकार करावा, अशा सूचना दिल्या. त्यासोबतच वाळू आणि दारुची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले. त्यासोबतच नशा निर्माण करणार्‍या द्रव्यांबाबत पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका ठेवावी. उद्योगांना त्रास देणार्‍या संघटित गुन्हेगारीचा कसोशीने बिमोड करावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास अजिबात मागे-पुढे पाहू नका, अशा सूचनासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

Exit mobile version