मनोहर बैले यांची मागणी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
वेळी-अवेळी पडणारा पाऊस, वादळवारा, वातावरणातील बदल यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आल्याने मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ येत असते. त्याकरिता शासनाने नुकसान भरपाईकरिता कोळी बांधवांना आर्थिक विशेष पॅकेज तरतूद या अधिवेशनात करावी, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष व आ. रमेशदादा पाटील यांच्याकडे केली आहे.
मागील काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे मुरुड तालुक्यातील कोळी मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन ते कर्जबाजारी झाले आहेत. बदलत्या वातावरणाचा गंभीर परिणाम मच्छिमारांना सहन करावा लागला आहे. याची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी आणि विशेष पॅकेजची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी केली.
अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून वातावरण बदलामुळे पारंपरिक मासेमारी आणि मासळी सुकविण्याच्या व्यवसायात कोळी समाजाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांना भरपाई आणि उपाययोजना आखली जावी यासाठी अभ्यास गट समिती गठीत करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच पावसाळ्यात मासेमारी बंदी काळात खावटी देण्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे निश्चित पाठपुरावा करणार, असे आमदार पाटील यांनी जिल्हा मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांना आश्वासित केले.







