| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव वेगात जाणारा ट्रेलरने फूड कोर्ट या हॉटेलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, या ट्रेलर खाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाला असून, या ट्रेलरने तीन कारला जोरदार धडक दिली.
ट्रेलर पुण्याहून मुंबईकडे जात असताना तो बोरघाटात आला असताना तो एक्सप्रेसवेवरील फूड कोर्ट हॉटेल जवळ चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील फूड कोर्ट हॉटेलला जोरदार धडक देऊन, समोर उभ्या असलेल्या तीन कारला ही जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात हॉटेलमधील काम करणारा कामगार इंद्रदेव पासवान, रा. बिहार याचा ट्रेलर खाली दबल्याने मृत्यू झाला आहे. तर तीन कारचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने हॉटेलमधील अन्य प्रवाशी आणि कामगारांना कोणतीही इजा झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ट्रेलरमध्ये अडकेल्या आणि त्या खाली दबलेल्या व्यक्तीना बाहेर काढून मदत केली, तर अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला काढून एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.