तीन जणांना पोलिसांनी केली अटक
| अलिबाग | प्रतिनिधी |
शिंदे शिवसेना गटातील आमदार महेंद्र दळवी यांच्या ग्रामपंचायत हद्दीतील थळबाजार गावातच गांजा, गावठी दारू आणि तलवारीचा साठा सापडला आहे. अलिबाग व मांडवा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी थळबाजार गावातील एका घरावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये रियाज अनवारे थळ बाजार, कारण पवार थळपेठ आणि ओमकार पेडणेकर संभाजीवाडा यांचा समावेश आहे. या तिघांकडून 11 हजार 210 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गांजा, दारू आणि चार तलवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपींवर अगोदरपासूनच अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
थळ पासून कनकेश्वर फाटा परिसरात बेकायदेशीररित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली होती. एका व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती मांडवा पोलिसांना खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली होती. शनिवारी सायंकाळी कनकेश्वर फाटा परिसरात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गांजा दिसून आला. त्याची कसून चौकशी केल्यावर थळबाजारमधून एका व्यक्तीकडून गांजा विकत घेतला असल्याची त्याने माहिती दिली. त्यानंतर मांडवा आणि अलिबाग पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून थळबाजार आणि थळपेठमधील घरावर कारवाई केली. या छाप्यात गावठी दारू, सुमारे अडीच ग्रॅम गांजा, चार तलवारी, काती आणि कोयता या शस्त्रांचा साठा सापडला. बेकादेशीररित्या सुरू असलेल्या या धंद्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. या तिघांकडून पोलिसांनी 390 रुपयांचा 224 ग्राम गांजा, 7310 रुपयांची रोख रक्कम, चार तलवारी, एक काती आणि एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
थळ परिसरात हे त्रिकुट अमली पदार्थ आणि शास्त्र विक्रीचा धंदा करीत असल्याची चर्चा होती. परंतु, या गांजा विक्री करणाऱ्यांच्या कारवाईमध्ये राजकीय दबाव येत असल्याने त्यांचे फावले होते. परंतु, आंचल दलाल यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीवर आला बसवण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे अलिबागच्या आमदारांच्या ग्रामपंचायत हद्दीत देखील सुरु असलेल्या अवैध धंद्यांना छाप बसवण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी अलिबाग आणि मांडावा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली. यापूर्वी रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यांवरील डिझेल तस्करीची पाळेमुळे थळ येथे येऊन थांबतात अशा चर्चांना उधाण आले होते. डिझेल तस्करांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना टार्गेट करण्यात येत आहे. या कारवाईत अजून नव्या चेहऱ्यांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.







