वाहनांची कसून तपासणी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थिर सर्वेक्षण पथके पनवेल शहर व परिसरातील विविध भागांत तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, कोणाकडून बेकायदेशीररित्या रोख रक्कम, मौल्यवान वस्तू अथवा प्रचार साहित्य वाहून नेले जात आहे का, यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसमोर, जेएनपीटीएनएच-4 महामार्गावर स्थिर तपासणीसाठी तात्पुरता मंडप उभारण्यात आला असून, या ठिकाणी निवडणूक अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनाची सखोल तपासणी केली जात असून संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, महामार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि सुरू असलेल्या कामांमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास तपासणी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. सतत धुळीच्या संपर्कात आल्याने अनेक कर्मचाऱ्यांना सर्दी, घसा खवखवणे व श्वसनासंबंधी त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही निवडणूक कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी आपले काम जबाबदारीने बजावत असल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि निष्पक्ष पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.







