जमिनीच्या वादातून लोखंडी शिगेने मारहाण
| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील दोन सख्ख्या भावांमधील पक्के वैर गुरूवारी सायंकाळी उघड झाले असून, जमिनीच्या जुन्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावाला लोखंडी शिगेने मारहाण केल्याचा गुन्हा पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे.
तुर्भे खुर्द येथील मनोहर शंकर उतेकर (65) याने घराच्या बाजूला पडवीमध्ये विटा ठेवल्या होत्या. दरम्यान, त्याचाच सख्खा भाऊ असलेल्या सहदेव शंकर उतेकर याला मागील जुन्या जमिनीच्या वादाची आठवण होऊन त्याने सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून लोखंडी शिग आणून मनोहर यांना शिवीगाळ करीत त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर तसेच कानाच्या डाव्या बाजूला डोक्यावर मारहाण करून जबर जखमी केले. या प्रकारनंतर पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सहदेव शंकर उतेकर याच्याविरूध्द रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे अंमलदार पोलीस हवालदार बामणे यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पोलीस हवालदार जागडे हे तपासिक अंमलदार म्हणून पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.