एक पाऊल शिक्षणासाठी

वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप ; रोहित विचारेंचा स्तुत्य उपक्रम

| खोपोली | वार्ताहर |

आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना खालापूर तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी संकल्प केला होता. या संकल्पानुसार त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. प्राथमिक शाळा खरिवलीमधील इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी वस्तुंचे वाटप रोहित विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील टाटा स्टील कंपनीचे व्यवस्थापक व त्यांचा संपूर्ण स्टाफ यावेळी उपस्थित होता. मुलांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी समाज बांधवांची मुले असल्याने त्यांना शाळेत जे शिकविले जाते तेवढाच, त्यांच्या घरी कोणीही शिक्षित नसल्याने त्यांचा अभ्यास होणे कठीण असतानासुध्दा मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून आलेल्या पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीसाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद गोष्ट असल्याचे बोलत शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.

आपण वाढदिवस साजरा करीत नसतो, परंतु त्या दिवसाचे औचित्य साधून समाजातील गोरगरीबांना माझ्या ऐपतीप्रमाणे काही तरी मदत करता येईल का, याचा मी सदैव प्रयत्न करीत असतो. याचाच हा एक भाग असल्याचे सांगत रोहित विचारे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश पाटील, युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version