नगरपंचायत प्रशासनाकडे बंदोबस्त करण्याची मागणी
। तळा । प्रतिनिधी ।
तळा शहरात सध्या पिसाळलेल्या कुत्रीची दहशत निर्माण झाली आहे. तळा बसस्थानकाच्या मागील बाजूस पिसाळलेल्या कुत्रीने गेल्या तीन दिवसात चार जणांना चावा घेतला आहे. यामध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. ही कुत्री कुठेतरी प्रसुती झाल्याने ती अधिक चवताळली आहे. तिने या चार जणांचा चावा घेऊन चांगलेच रक्तबंबाळ केले आहे. त्यामुळे या कुत्रीची दहशत निर्माण झाली असून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून बाजारात यावे लागत आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नसबंदी करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका प्रशासनाने घेतलेली नाही. शालेय विद्यार्थी, लहान मुलांना, जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांना लगेचच पळ काढता येत नाही. त्यामुळे या पिसाळलेल्या कुत्रीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.







