गर्भपात करणाऱ्यांवर खबऱ्यांची नजर

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आता खबऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मुलगी वाचवा, देश वाचवा या उपक्रमातून खबऱ्याला खबऱ्या बक्षीस योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

मुलीच्या जन्माबाबत रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाबरोबरच वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी घराघरात जनजागृती केली. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाव बेटी पढाव सारखे अभियान राबवून शहरी भागासह ग्रामीण भागात त्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून गर्भलिंग निदान व गर्भपात टाळण्यासाठी मुलगी वाचवा देश वाचवा हे अभियान शासनाने सुरु केले आहे. या अभियानातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 सुधारित 2003 या कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रत्यक्ष अथवा अर्जाद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. पडताळणी करून दोषींविरोंधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी लिंग निदानाची माहिती शासकिय कार्यालयात त्वरित द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली.

Exit mobile version