| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतलं आहे. उपचारादरम्यान 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याच्या छेडछाडीला आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. रेणुका बालाजी साळुंके असे पेटवून घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दि.7 मार्च रोजी हा प्रकार घडला. रेणुका ही पुण्यात एका इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला अश्लील मेसेज करायचा. या सर्व प्रकारमुळे रेणुका खूप घाबरली. याशिवाय हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये राहणारी मुस्कान ही देखील रेणुकाला अभ्यास करू द्यायची नाही आणि जाणून बुजून त्रास द्यायची. या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतले. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या घटनेत तिचं शरीर जास्त भाजले होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी हॉस्टेलच्या कॅन्टीन कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान सिध्दू या दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.