कर्जतमध्ये तीन शेतकर्यांनी घेतले उत्पादन
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील शेतकरी पावसाळा संपला की, कडधान्याची शेती करतात. जमिनीमधील ओलाव्यावर केल्या जाणार्या कडधान्य शेतीला पर्याय म्हणून बटाटा पिकाची शेती समोर आली आहे. तालुक्यातील तीन शेतकर्यांनी हा प्रयोग केला असून बटाट्याची शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
कर्जत तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. त्यात शेतकर्यांना भात पिकानंतर नगदी पिकांकडे कसे नेता येईल याकडे कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील असतो. कळंब येथील पांडुरंग बदे, पोशीर येथील भारत हाबळे, अनिल जोशी या शेतकर्यांनी बटाट्याची नाविन्यपूर्ण लागवड करून एक पाऊल पुढे टाकले. पोषिर येथील शेतकरी अनिल जोशी यांनी बटाटा लागवडीचा प्रयोग हा भात पिकानंतर कडधान्यावर अडकून पडलेल्या तालुक्यातील शेतकर्यांना पर्याय देणे व त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया उद्योग यामधून बटाट्याची शेती करण्याचा प्रयोग केला आहे.
यंदाच्या वर्षी थोड्या उशिराने हा प्रयोग करण्यात आला. परंतु, पुढच्या वर्षी कृषी विभागाच्या तांत्रिक साह्याने हा प्रयोग वेळेत व यशस्वीपणे राबवण्याबाबत संबंधित शेतकर्यांनी मान्य केले. शेतकर्यांच्या या प्रयोगांना कृषी विभाग सातत्याने प्रोत्साहित करत असतो, त्या अनुषंगाने कळंब कृषी सहाय्यक अनिल रुपनवर आणि विजय गंगावणे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तांत्रिक मार्गदर्शन करण्याकरिता कृषी पर्यवेक्षक सचिन केने, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी यांचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. त्याचाच परिपाक म्हणून बटाटा सारखे एक उपपदार्थ बनवून कर्जत तालुका लगत असलेल्या मुंबई महानगरीत त्याचे मार्केटिंग करता येईल, हा विचार मांडण्यात आला.
शेतकर्यांना कडधान्य शेतीला आणखी एक पर्याय मिळाला आहे. बटाटा पिकाची शेती करणार्या शेतकर्यांना प्रोत्सहन म्हणून पुढील वर्षी चांगले बियाणे कृषी विभाग यांच्याकडून उपलब्ध करून दिले जाईल.
अशोक गायकवाड,
कृषी अधिकारी
अनिल जोशी,
आम्ही प्रगत शेती करण्याचा विचार केला आणि आमचा पहिलाच वेगळ्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यातून आम्हा शेतकर्यांना आणखी प्रेरणा मिळेल.
शेतकरी