मुरुडमध्ये भीषण अपघात! आमदाराच्या गाडीने तरुणाला चिरडले

दुचाकीचा चक्काचूर

| आगरदंडा/मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी रस्त्यावर असणाऱ्या टोलनाका येथे दुचाकी आणि आ. महेंद्र दळवी यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. जसीम अब्दुल रहेमान पासवारे (31) रा. माणगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सदरचा अपघात हा दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. अपघात इतका भयानक होती की, दुचाकीचा अशरक्षः चक्काचूर झाला असून, प्रत्यक्षदर्शींच्या अंगाचा थरकाप उडाला. मुरुड-अलिबाग मतदारसंघाचे आ. महेंद्र दळवी हे मुरुड-नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. जसीम अब्दुल रहेमान पासवारे हा आपली हीरो होंडा पॅशन या दुचाकीवरून माणगावकडे जात असताना आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी येथील टोलनाक्यावर आ. महेंद्र दळवी बसलेल्या वाहनाची आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये दुचाकीस्वार जबर जखमी झाला. त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये आ. महेंद्र दळवी हेसुद्धा किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची नोंद मुरुड पोलिसात रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, जसीम याला पत्नी, दोन लहान अपत्य, आई, बहीण, भाऊ आहेत. तो सेल्समनचे काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, काम आटपून तो आपल्या माणगाव येथील घरी चालला होता.

जसीम रक्ताच्या थारोळ्यात, तर आ. दळवींना भूमीपूजन महत्त्वाचे?
अपघात झाल्यानंतर जखमी जसीम रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आमदारांसोबत असणाऱ्या पोलीस वाहनातून त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तर आ. दळवी हे रुग्णालयात न जाता थेट उसरोली येथील रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रस्थळी निघून गेल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे आमदाराविरोधात जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे.
भावाबहिणीला अश्रू अनावर
मृत जसीमचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. त्यावेळी सख्ख्या भावाचा मृतदेह डोळ्यादेखत पाहताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्याच्या भावाबहिणीने एकच हंबरडा फोडला. त्यांना अश्रू अनावर झाले.
Exit mobile version