| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवदंडा मार्गावर रविवारी (दि.7) सकाळी दोन बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीतील चालक, वाहकांसह अंदाजे 12 जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही बसचा चेंदामेंदा झाला आहे. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळी मुरुड आगारातून भांडुप येथे जाण्यासाठी एसटी (एमएच-20-बीएल-2231) बस निघाली. दरम्यान, सकाळी 7.45 वाजताच्या सुमारास आक्षी-नवेदर बेली नजीक आल्यावर समोरून अलिबाग बाजूने रेवदंडाकडे जाणारी एसटी (एमएच-20-बीएल-3219) बस आली. रेवदंडा एसटी चालकाला येथील वळणाचा अंदाज न आल्याने विरुद्ध बाजूला जात वळण घेत असता मुरुडकडून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसचे प्रचंड नुकसान झाले असून चालक, वाहकासह अंदाजे 12 प्रवासी जखमी झाले आहेत. आक्षी-नागाव ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे अलिबाग-रेवदंडाकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परंतु, रहदारी कमी असल्या कारणाने तसेच पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.
या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच बीट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, हायड्राच्या मदतीने दोन्ही एसटी बस बाजूला करण्यात आल्या असून वाहतूक सुरळीतपणे सुरु करण्यात आली आहे.