खासगी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्‍यू

 10 प्रवासी जखमी

| खोपोली | प्रतिनिधी |

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका खासगी बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 10  प्रवासी जखमी झाले आहेत.

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून सोमवारी (दि.11) वैभव ट्रॅव्हलची बस प्रवासी घेऊन मुबंई ते कोल्हापूर अशी जात असता बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चालक राजू गावडे (40) रा.सांगली याचा जागीच मृत्यू झाला. तर, बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ लोकमान्य टिळक हॉस्पिटल पुणे आणि काहींना एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातात बस आणि  कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बस क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version