एक ठार, एक जखमी
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणार्या टेम्पोने एका ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांनी पेट घेतला. शनिवारी (दि. 20) पहाटे झालेल्या या दुर्घटनेत टेम्पोचालकाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी आहे. जखमीला उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खालापूर येथील फुडमॉलजवळ मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवर ही दुर्घटना घडली. तीव्र उतारावर कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो साखरेची वाहतूक करणार्या ट्रकवर जाऊन धडकला. या धडकेमुळे दोन्ही वाहनांना आग लागली. या भीषण अपघातात कोंबडी वाहतूक करणार्या टेम्पो चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला. तर, मोहम्मद सलमान (24) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टेम्पो चालकाचा डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच आयआरबी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, खोपोली अग्नीशमन दल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमीसह मृत टेम्पोचालकाचा मृतदेह बाहेर काढला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.