गोदी नदीच्या पुलाला झुडपांचा विळखा

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावरील कोकण रेल्वेच्या पुलाखाली असणार्‍या गोदी नदीच्या पुलाला असंख्य काटेरी झुडपांनी विळखा घातल्यामुळे वाहने दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे.

आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे रोहाकडे जाण्यासाठी महामार्गाच्या कोकण रेल्वेच्या पुलाखालून कोलाड हायस्कूलच्या नाजिकचा मार्ग असल्यामुळे हलकी वाहने अथवा दुचाकीस्वार या मार्गांवरून प्रवास करीत आहेत. परंतु गोदी नदीच्या पुलाला असंख्य झाडेझुडपे व वेलीने वेढले आहे. यामुळे या मार्गांवरून पलीकडे जाणार्‍या प्रवाशांना कोलाडकडून मुंबई बाजूकडे जाणारी वाहने दिसत नाही. यामुळे या मार्गावर अपघात होऊन नाहक बळी जाऊ शकतो. निद्राअवस्थेत असणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याने अशा महत्वाच्या कामाकडे लक्ष देऊन गोदी नदीच्या पुलाला वेढलेली झाडेझुडपे तातडीने तोडण्यात यावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Exit mobile version