महिलांनी बाहेरून लावली कडी
| रोहा | प्रतिनिधी |
हातात धारदार शस्त्र घेऊन एक परप्रांतीय तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने आलिशान बंगल्यात घुसला. त्याच्या दहशतीला घाबरून घरातील दोन कामगार महिलांनी घराबाहेर पळून जाऊन बाहेरून दरवाजाची कडी लावली आणि घडलेला सारा प्रकार घरमालकाला सांगितला. यादरम्यान घरात अडकल्याच्या भीतीने त्या चोरट्याने घरातील किमती चीजवस्तूंची तोडफोड केली. मालकाने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्याची विनंती केली. पोलीस येऊन आपल्याला अटक करणार या भीतीने बंगल्यात अडकलेल्या चोरट्याने थेट पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत चोरट्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. आता चोरट्याला पळता येत नसल्याने घरमालक आणि नोकरांनी त्याला दोरीने बांधून ठेवून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना एखाद्या चित्रपटात शोभून दिसणारी असली तरी प्रत्यक्षात घडलेली हकीकत आहे. दिवसाढवळ्या रोह्यात अशा पद्धतीची धक्कादायक घटना घडल्याने साऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
या बाबत घडले असे की, रोहे रेल्वे स्टेशनच्या पलीकडे नव्याने तयार होत असलेल्या मेघासिटी फेस 2 या परिसरात पिंगळसई येथील सुनिल मुटके यांचा दोन एकर जागेत फार्म हाऊससहित आलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्यात सोमवारी (दि. 1) रोजी दुपारी 1:45 वा.च्या सुमारास गंदूर झगरू ओरण लकडा ( रा.केडली जि. गुमला-झारखंड ) या परप्रांतीय चोरट्याने आपल्या हातातील कुदल व फावड्याने बंगल्याच्या मुख्य दरवाज्याची काच फोडून आत प्रवेश केला. या दरम्यान फार्म हाऊसचा देखरेख करण्यासाठी असलेल्या संगीता वाळेकर व त्यांची मुलगी अनु अनिल वाघमारे यांनी घाबरून बंगल्याबाहेर पळ काढला आणि बंगल्याच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून घडलेल्या घटनेची माहिती सुनिल मुटके या घर मालकाला दिली. घर मालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. या दरम्यान बंगल्याला बाहेरून कडी लावल्याची माहिती समजताच बंद घरात अडकलेल्या चोराने घरातील टेबल, टीव्ही, गॅस, अशा 75 हजार रु. किंमतीच्या चीजवस्तू हातातील कुदल व फावड्याने फोडून सामानाची नासधूस केली. आता आपली यातून सुटका होणार नाही. म्हणून त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा बेत अखला.आणि त्याने खाली उडी मारली. या दरम्यान खाली काँक्रीटीकरण असल्याकारणाने त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. आणि त्याला पळता येत नसल्याने घर मालक आणि महिलांनी त्याला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पहिल्या माल्यावरून उडी घेतल्याने चोराचे दोन्ही पाय फॅक्चर झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबद्दल रोहा पोलीस ठाण्यात सुनील मुटके यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. रसाळ करित आहेत.







