धक्कादायक! डंपरखाली चिरडलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला जंगलात पुरले

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकलीला डंपरने चिरडले. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात पुरण्यात आला. त्याची कुठेही वाच्यता करू नये यासाठी कुटुंबावर दबावदेखील टाकला गेला. याबाबत गावात चर्चा होती, पण सर्वजण गप्प होते. ही बातमी सावंतवाडी पोलीसांपर्यंत पोहोचली. तेव्हा पोलिसांनी याचा तपास सुरु केला. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तो मृतदेह उकरून बाहेर काढला.

रोजगारासाठी एक कुटुंब सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील मळेवाड येथली चिरेखाणीत काम करत होते. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला डंपरने चिरडले होते. या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्या मुलीचा मृतदेह मळेवाडच्या जंगलात पुरला गेला होता. तसेच, त्यानंतर तिच्या आई-वडिलांवर दबाव टाकून त्यांना गावी पाठवून देण्यात आले. याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांनी प्राथमिक चौकशी केली आणि त्यात माहितीची पुष्टी झाली. त्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी सावंतवाडी येथील न्यायालयाकडे मागितली. त्यानंतर छत्तीसगड येथील मुलीचे वडील श्री. ब्रिजराज दास यांना बोलावून घेतले. शुक्रवारी (दि. 23) सकाळी सावंतवाडी पोलिसांचे तसेच महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी शोध घेतला असता दुपारच्या सुमारास पाच ते सहा फूट खोल अंतरावर मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी डंपरचालक धनु लमाणी (40) याच्यावर मृतदेह पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आले आहे.

Exit mobile version