‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी‘ संस्थेने जिंकली मने
। रायगड । खास प्रतिनिधी ।
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मा. रायगड जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी (दि.25) जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. या दिवशी जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळी पार करून वाहत होत्या. नदी नाले तुडुंब भरले होतेच आणि शेत जमिनीसह कित्येक गावांतील घराघरात पाणी घुसले होते. ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी नेहमीप्रमाणे आपली सज्जता दाखवत ठिकठिकाणी मदतकार्य सुरू ठेवले होते. यादरम्यान, एक युवक उल्हास नदीच्या पात्रात अडकल्याची बातमी खालापूर तालुक्याचे तहसीलदार यांना मिळाली. यावेळी ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ संस्थेने शर्तीच्या प्रयत्नांने उल्हास नदीला भेदत त्या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. याचा व्हिडीयो सोशल मिडीयावर सर्वत्र शेअर करण्यात आला असून या समाजीक संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या समवेत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी गुरूवारी पूर परिस्थितीचा आढावा घेणे सुरू ठेवले होते. तसेच, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची’ टीम त्यांच्या समवेत कार्यरत होती. त्याचवेळी आयुब तांबोळी यांना तहसीलदार शितल रसाळ यांनी कर्जत तालुक्यातील वावे – बेंडसे गावाजवळ एक युवक उल्हास नदीच्या पात्रात अडकून पडल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तांबोळी यांनी दुपारी दोनच्या सुमारास “योद्धा” वाहनासह अँब्युलन्स आणि इतर वाहनांचा ताफा कर्जतकडे रवाना केला. त्या ठिकाणची स्थिती खूप भयानक होती. ज्या रस्त्याने टीम आली होती तो रस्ता पुढे उल्हास नदीने अक्षरशः गिळंकृत केला होता आणि साधारणता एक किलोमीटर अंतर नदीच्या पात्रात रूपांतरित झाले होते. नदीपात्रात हरवलेला रस्त्याच्या खानाखुणांची स्थानिकांकडून माहिती घेऊन पूर्वीच ठरलेल्या पॉलिसी प्रमाणे अमोल कदम, हनीफ कर्जीकर, विशाल चव्हाण आणि विकास पाटील नदीचे पात्र भेदत कामगिरीवर रवाना झाले.
प्रथम फळीत पूढे गेलेल्या चार जणांच्या बॅकअपसाठी गुरुनाथ साठेलकर आणि सौरभ घरत विस्तारलेल्या नदीपात्रात उतरले. प्रत्येकाने स्वतःच्या सेफ्टीसाठी सुरक्षा साधने घेतली होती. पावसाचे प्रमाण वाढले होते. पहिल्या फळीतले मेंबर पाण्यात अडकलेल्या युवकाच्या इतक्या जवळ पोहोचले होते की ते एकमेकांशी संवाद करू शकत होते. मात्र, त्यांच्यात फक्त संवादच होऊ शकत होता. कारण दोघांच्या मध्ये नदीचा अत्यंत जोरदार प्रवाह वाहत होता. त्या युवकाला पोहता येते याची खात्री करून त्याने प्रवाहासोबत उडी मारल्यास त्याला साखळी करून आपण तुला सुरक्षितपणे पकडणार आहोत, असे समजविण्यात रेस्क्युअर्स यशस्वी झाले होते. चार ते पाच तास अथांग पात्रात अडकलेल्या युवकाने अखेर रेस्क्यू टिमच्या भरवश्यावर युवकाने पुराच्या पाण्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अमोल कदम, राजेश पारठे, हनीफ कर्जीकर, विशाल चव्हाण, विकास पाटील, सौरभ घरत साखळी करून हे सज्ज होतेच. मात्र, नदीचा वाढता प्रवाह त्या युवकाची दमछाक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी तातडीने विशाल चव्हाणने त्या युवकाच्या मदतीसाठी पाण्यात बेधडक सूर मारला. पाण्याचा जोरदार प्रवाह विशालला मागे सारत होता तरीही जिद्दीने प्रवाहाविरुद्ध पोहत त्याने त्या युवकाला गाठले आणि त्याला पकडून सुरक्षित ठिकाणावर आणण्यास सुरुवात केली. त्या दोघांना इतरांनी सहकार्य केले. शेवटी सर्वांच्या जिद्दीपुढे नियती हरली. ते शेवटचे आणि अटीतटीचे क्षण वावे आणि बेंडसे गावच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या ज्या गावकऱ्यांनी अनुभवले त्यांनी त्या थराराला शिट्ट्या, टाळ्या आणि चित्कारांनी दाद दीली.
यावेळी कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, कर्जत तालुक्याचे तहसीलदार शितल रसाळ, नायब तहसिलदार आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ टीमचे आभार मानले.
)