अखेरच्या चेंडूवर राजस्थानवर मात
| जयपूर | वृत्तसंस्था |
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यात हैदराबादने चार विकेट्सने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने हैदराबादला 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण हैदराबादने शेवटच्या चेंडूवर अब्दुस समदच्या षटकारासह विजय मिळवला.
हैदराबादसाठी हा करो या मरो सामना होता आणि यावेळी नशिबही त्यांच्या बाजूने होते. अखेरच्या चेंडूवर त्यांना फ्री हिट मिळाली आणि त्यांनी चार विकेट्स राखत दमदार विजय साकारला. राजस्थानने जोस बटलरच्या 95 आणि कर्णधार सॅमसनच्या 66 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादपुढे 215 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पहिल्या 10 षटकांत चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर अखेरच्या षटकात दमदार फलंदाजी करत त्यांनी विजय साकारला.
हैदराबादच्या 215 धावांचा पाठलाग करत असताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कारण हैदराबादला पहिला धक्का अनमोलपप्रीतच्या रुपात बसला, त्याने 25 चेंडूंत 33 धावा केल्या. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषक शर्मा यांनी केलेल्या भागिदारीमुळे हैदराबादला पहिल्या 10 षटकांमध्ये 1 बाद 87 अशी मजल मारता आली. अभिषेकने यावेळी अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर अश्विनने त्याला 55 धावांवर बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला.
राजस्थानच्या संघाने यावेळी सुरुवातच झोकात केली होती. बटलरने यावेळी सुरुवातीपासून धडाकेबाज फलंदाजी करायला सुरुवात केली. बटलरने या सामन्यात 59 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 95 धावांची खेळी साकारली. पण बटलर आऊट झाला आणि त्यानंतर संजूने हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. संजूचे सनरायझर्स हैदराबादसंघाविरुद्ध हे सलग चौथे अर्धशतक ठरले.
संजूने या सामन्यात आयपीएलमधील 300 चौकारही पूर्ण केले. संजूने सामन्यात 38 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 66 धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला यावेळी 200 धावांचा पल्ला गाठता आला.