बसस्थानकातील आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन बसस्थानकातील शौचालयाची टाकी उघडी असल्याने सध्या माखजन येथील आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. माखजन ग्रामपंचायतीने सतत एसटी प्रशासनाला सांगूनदेखील याकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची माहिती सरपंच महेश बाष्प्टे यांनी दिली आहे.

माखजन बसस्थानकातील शौचालयाच्या टाकीतून सायंकाळी डासांची झुंडीच्या झुंडी उठताना स्थानिकांना पाहायला मिळत आहे. उघड्या टाकीमुळे साथीचे रोग पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. यातच आजूबाजूला काही अंतरावर खाण्याचे स्टॉलदेखील आहेत. यामुळे डास तसेच उठणार्‍या माशा, खाद्य पदार्थांवर जाऊन बसल्यास आजाराला निमंत्रण देणार हे नक्की.

या गंभीर बाबीकडे बसस्थानक व्यवस्थापनाने अर्थात विभागीय देवरुख आगाराने लक्ष देण्याची गरज आहे. या उघड्या टाकीचा बंदोबस्त 15 ऑगस्टच्या आतमध्ये न झाल्यास माखजन येथील बसस्थानकात आंदोलन केले जाईल, असा इशारा सरपंच महेश बाष्टे यांनी दिला आहे.

Exit mobile version