। महाड । वार्ताहर ।
किल्ले रायगड पाहण्यासाठी आलेल्या तरुण पर्यटकांचा पाचाड येथे झोपेतच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि. 26) रात्री घडली. महेश तानाजी शिंदे (वय 33) रा. देवळाली, बदलापुर ता. अंबरनाथ, जि. ठाणे हा पर्यटक किल्ले रायगड पाहण्यासाठी आला होता. तो रायगडवरुन सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाचाड येथील जिजाऊ कोल्ड्रिंक्स या दुकानाच्या वरंड्यात झोपला होता.
त्याला उठवण्यासाठी जिजाऊ कोल्ड्रिंक्सचे मालक शेडगे हे गेले असता तो उठलाच नाही.त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता तो पर्यटक मृत्यु झाल्याचे समजले. याबाबत पाचाडचे पोलीस पाटील गणेश पाडुंरग डावले यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असुन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. मरण पावलेल्या महेश शिंदे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अवसोरमल करीत आहेत.