माघी पौर्णिमेची शेकडो वर्षांची परंपरा

लोणंद, जेजुरी, सासवड, वाईचे भक्त धावीर महाराजांच्या दर्शनाला

| रोहा | प्रतिनिधी |

साऱ्या जगाला पंढरपूरच्या वारीचे अप्रूप आहे. त्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाई तसेच जेजुरी, सासवड येथून न चुकता आपल्या कुटुंबकबिल्यासह नियमित धावीर महाराजांच्या वारीला लोक येतात. साधारणपणे कोल्हाटी, वडार, डोंबारी व लोककला सादर करणारा समाज सुमारे दोनशे वर्षांपासून धाविराच्या दर्शनाला व स्वसंरक्षणासाठी कळा लावायला येथे येतात. पूर्वी दरवर्षी वारी करणारे हे भक्तगण सत्तर-बहात्तर सालानंतर दर तीन वर्षांनी माघ महिन्यात पौर्णिमेला येतात. यंदादेखील माघ पौर्णिमेस देवाची जत्रा साजरी करण्यासाठी भक्तांनी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत तसेच रोह्याच्या नदी संवर्धन समोरच्या मोकळ्या मैदानात राहुट्या टाकून आपला मुक्काम ठोकला आहे.

वारीला येताना हे लोक परंपरेने त्यांच्यासोबत त्यांचा देव्हारा आणत असून, त्या देव्हाऱ्यात कुलदैवता म्हणून इतर देवतांसोबत धावीर महाराजांचीसुद्धा स्थापना असते. त्यांच्या देव्हाऱ्यातील श्री धावीर महाराजांच्या टाकाला (मूर्तीला) धावीर मंदिरातील पुजारी शेंदूर लावून देवांची भेट घडवून आणतो. त्याबरोबर इतर धार्मिक विधी करुन गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. माघ पौर्णिमेनंतर आलेले सर्व भक्त देवांना समुद्रस्नान घालण्यासाठी रेवदंडा येथे जातात, तिथे शीतला देवीचे, म्हसोबाचे दर्शन घेऊन धावीर महाराजांची वारी पूर्ण होते.

पूर्वी हे लोक जेजुरी-सासवड-कोंढणपुर-पानशेत-लिंग्याचा घाट ताम्हिणी घाट ते कोलाड मार्गे रोहा असा पायी प्रवास करीत असत, आता स्वतःच्या वाहनातून येतात. जेजुरीवरून येणारे वारकरी खंडेरायाच्या पालखीचे मानकरी असून, साधारण ही मंडळी एकमेकांचे सगेसोयरे असल्याचे सांगण्यात आले. हा उत्सव साजरा करण्यासाठी कोल्हाटी समाजातील गणेश माळी, वैजनाथ माळी, मनोज लाखे, रवि लाखे, अशोक माळी, नामदेव लाखे, रघुनाथ जावळेकर, अनिल माळी, शंकर लाखे, मिठू लाखे, रोहन माळी, नितीन गाडे, गणेश गाडे, तेजस गाडे, सनी माळी, उमेश माळी, ऋषीकेश लाखे, अभिषेक माळी, दिपक लाखे, प्रथमेश लाखे आणि इतर सर्व तरुण मित्र सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version